Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, संजय राठोड यांना मंत्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता, असे सांगत भाजपने हात वर केल्याचे सांगितले जात आहे.
बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता देवेंद्र फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या गिरीश महाजन यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात मिळालेल्या स्थानाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. मला वाटते की, चित्रा वाघ यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या आधीपासून याबाबत आवाज उठवत आहेत, त्याबाबत संदेह नाही. परंतु, त्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे किंवा सुरू आहे. प्रथमदर्शनी त्यांनाही त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. अब्दुल सत्तार यांच्याबाबतही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण त्यांनी सांगितले आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणाच्याही माध्यमातून उच्चस्तरीय समिती नेमावी आणि चौकशी करावी, असे गिरीश महाजन म्हणाले.
नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडने काम करणार
तांत्रिकदृष्ट्या विस्ताराला विलंब झाला असला तरी आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे सरकार वेगाने काम करेल. जुने, नवे अनुभवी सगळ्यांचा ताळमेळ घालून पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला आहे. उद्या कॅबिनेट आहे. जो अडीच वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी डबल स्पीडने काम करावं लागेल. आता केंद्र आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांना गती देता येईल. आम्हाला विकासाचा वेग भरून काढायचा आहे. त्याचसोबत २-३ दिवसांत खातेवाटप होईल असंही गिरीश महाजनांनी सांगितले.
दरम्यान, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.