BJP Girish Mahajan News: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यापैकी कुणाच्या बाजूने मतदार कौल देणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
बारामतीत प्रचारसभेची सांगता होताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. यावर, रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाही. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत. मला असे वाटते की, त्यांनी मुद्द्यावर बोलावे, विकासावर बोला कामावर बोला, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष होता, असा दावा संजय राऊतांनी केला होता. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनता ही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही.
एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपा प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले असले तरी याबाबत अद्यापही काही हालचाली होताना दिसत नाही. असे असले तरी एकनाथ खडसे हे रक्षा खडसे यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. यावर, एकनाथ खडसे हे जर रक्षा खडसे यांचा प्रचार करत आहेत हे चांगले आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही. मात्र, माहिती मिळाल्यावर बोलेन, असे सांगत गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटले का? तेव्हा उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावे का? आमच्यासोबत होते म्हणून तुमच्या १८ जागा निवडून आल्या. आता तेवढ्याही येणार नाहीत. आमच्यासोबत नसते तर १५ तरी आमदार उद्धव ठाकरे यांचे निवडून आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे, असे गिरीश महाजन म्हणाले.