BJP Girish Mahajan News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन डोके टेकवले होते. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होऊन जोरदार हल्लाबोल केला. यातच उद्धवजी, प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीला तुमचे समर्थन आहे का, अशी विचारणा करत, या प्रकरणी तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा, अशी मागणी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचे कुणीही समर्थन करू शकत नाही. हे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांचे या गोष्टीला समर्थन आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. तसेच अलीकडेच ठाकरे गटातील दोन नेत्यांनी एकाच दिवशी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
भविष्यात आणखी काही लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत
उद्धव ठाकरे यांना झटक्यावर झटके बसत आहे.भविष्यात आणखी काही लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे सकाळच्या भोंग्याशिवाय आता काहीही राहिले नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, न्यायालयाने निर्णय दिल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच निर्णय होईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय रोवताना दिसत आहे. यावर, पैशाचा आणि निधीचा वापर ते करत आहेत. पण त्यांना फार काही उपयोग होणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे मुरलेले लोक आहे आणि मतदार मुरलेले आहे. पण मला नाही वाटत की, त्यांना यश मिळेल, असे महाजन म्हणाले.