Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. विरोधक महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातील टोलेबाजीवरूनही दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरून भाजपने त्यांना टोला लगावला आहे.
छगन भुजबळ सोबत राहिले असते, तर त्यांनाच मुख्यमंत्री केले असते, अशा आशयाचे विधान उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात बोलताना केले. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहेत. यातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच व्हायचे होते. मग कुणीही त्यांच्यासोबत असते तरी. मग ते एकनाथ शिंदे असते किंवा भुजबळ असते तरी त्यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केले नसते, असा खोचक टोला महाजन यांनी लगावला.
हे एकमेकांना गुदगुल्या करत आहेत
छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते आणि शिवसेना भुजबळांबद्दल काय काय बोलत होती, हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे. मी तर भुजबळ फुटल्यापासून ३० वर्षं सोबतच आहे. यांची किती टोकाची भाषा होती? पण आज हे एकमेकांना गुदगुल्या करत आहेत की ‘तुला मुख्यमंत्री केलं असते, याला केले असते, मी झालो असतो, तो झाला असता’. आता यांच्या गंमतीजमती बघायला मिळत आहेत, या शब्दांत महाजन यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, भाजप आता वाणी-ब्राह्मणांचा पक्ष न राहाता बहुजनांचा पक्ष झालाय, अशा आशयाचे विधान एकनाथ खडसेंनी केले होते. यावर बोलताना, आपण लक्षात घ्यायला हवं की माणूस फक्त जातीवर समाजात मोठा होत नाही. तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळेही मोठा होतो. देवेंद्र फडणवीसांबाबत संपूर्ण देश सांगेल की हा माणूस किती कॅलिबरचा आहे. तुम्हाला खूप वाटते की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. पण तुम्ही आत्मपरीक्षणही करायला हवे. तु्म्हाला जे वाटते, ते लोकांनाही वाटले पाहिजे. तुम्ही काय काय पराक्रम केले आहेत, ते सगळे समोर येत आहेत, या शब्दांत महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"