Maharashtra Politics: आमची २५ वर्षांची युती होती, त्यात आम्हाला काय मिळाले? २०१४ पूर्वीच भाजपने युती तोडली. आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास आम्हाला भाग पाडले गेले. फोडाफोडीचे राजकारण करून देशाला बदनाम केले जात आहे. पाच वर्षे आपण एकत्र असतो मग निवडणुकीच्याच वेळी वेगळे का होतो. शिवसेनेने कायम माणुसकी जपली, असे सांगत उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात भाजपवर सडकून टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तुम्ही मैदानात या. तुमच्या बाजूने किती जनमत आहे हे दाखवा, असे आव्हान भाजपकडून देण्यात आले आहे.
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. एकच वर्ष निवडणुका राहिल्या आहेत. पाच वर्षातून पाचवेळा थोडीच निवडणुका होत असतात. आमच्या भरवशावर १८ खासदार आणि ५५ आमदार निवडून आणले. तेव्हा आम्ही म्हटले असते, निवडणुका घ्या; मग घेतल्या असत्या का, त्यावेळी तुम्ही पळून जात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसला, या शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकास्त्र सोडले.
तुमच्या बाजूने किती जनमत आहे हे दाखवा
महापालिका निवडणूक समोर असून, तुम्ही मैदानात या. तुमच्या बाजूने किती लोकमत आणि जनमत आहे, हे दाखवा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता, त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. पण, आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. काँग्रेसची विचारधारा स्वीकारून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली. त्यामुळे, युती तोडण्याला जबाबदार फक्त उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे असे काहीतरी बोलत असतात. सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे; त्याला समर्थन द्यावे. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"