Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा सक्रीय झाले असून, एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून पुढील रणनीतिला सुरुवात केली आहे. यातच रोहित पवार आणि राष्ट्रवादीतील काही नेते भाजपच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजप नेत्याने शरद पवार कुटुंबार निशाणा साधला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी आढावा बैठक घेतली. यावेळी शरद पवार यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या. यानंतर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे.
पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे
संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. यावर जेवढी नावे त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सखोल चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
यांच्याबद्दल जनताच योग्यवेळी निर्णय घेईल
रोहित पवारांवर होणाऱ्या आरोपांसंदर्भात बोलताना, रोहित पवारांचे काय होणार? याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजप नेते त्याआधीच असे होणार, तसे होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, यांच्या घरावर धाड पडणार, यांचे अमुक होणार, त्यांचे तमुक होणार, आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
दरम्यान, लवकरच काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. त्याची सुरुवात ठाण्यापासून करणार आहे. कारण ठाण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी ठाण्यातच केले. केंद्रातील भाजप सरकारने याआधी देशवासियांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगत आपण लवकरच राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढाव घेणार आहोत, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.