Maharashtra Politics: समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानांमुळे भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला असून, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. यातच कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील, अशी टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना आव्हाडांवर पलटवार केला आहे.
कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील
जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळे बोलत असतील. असे मला वाटते आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मतांच्या राजकारणासाठी घाणेरडे विधान करणे, घाणेरडे राजकारण करणे ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावे, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केले जात आहे, हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेले आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
दरम्यान, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ, असे जितेंद्र आव्हाड यांनी ठामपणे सांगितले. तसेच बहुजन इतिहास डोळ्यात का सलतो? असा थेट विचारणा आव्हाडांनी केली असून ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"