मुंबई: गोव्यासह देशातील पाच राज्यांसह चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठे यश मिळवले आहे. यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात दाखल झाले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी, भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नसल्याचे म्हटले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या २० वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये. महाराष्ट्रात २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार महाराष्ट्राने भाजपच्या चिन्हावर निवडून दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून लोकांच्या समोर गेलो. फडणवीसांना पुन्हा महाराष्ट्रातील लोकांनी मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी भाजपाचे १०६ भाजपाचे आमदार आणि जवळपास ५५ शिवसेनेचे आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिल्याचे आपण बघितले. परत तुम्ही विश्वासघात केला. सत्तेमध्ये आलात, या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
साताऱ्यात पावसात भिजूनही ५४ च्या वर जाता आले नाही
जनता भाजपसोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असे वातावरण तयार केले तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही. त्यांची ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागत आहे. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असे सांगावे लागत आहे. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावे लागते आहे की भाजपाला मी येऊ देणार नाही, अशी टीका पडळकर यांनी केली.
दरम्यान, आम्ही लोकांसाठी काम करतोय. भाजपची काळजी करायचे कारण राष्ट्रवादीला नाही. त्याचे आमदार कसे शाबूत राहतील, त्यामध्ये काही गळती होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुमचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही. तुम्ही जर सगळ्या देशाचे नेतृत्व करायची भूमिका घेत आहात. देशातील, राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहात, मग महाराष्ट्रात तुम्हाला तुमचा, राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री म्हणून का बसवता आला नाही याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या, असे आव्हान पडळकर यांनी शरद पवार यांना दिले आहे.