मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजपाने संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
"तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच" असं म्हणत भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. "महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी अनेक खोट्या केसेस दाखल केल्या. आपल्याला अनेक प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण पुरावेच नसल्याने त्यात न्यायालयाने जामीनही दिला. तुम्ही दाखल केलेल्या केसेस, प्रकरणात आम्ही आजही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहोत. पण आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही तो मी नव्हेच" असं म्हणत पडळकरांनी हल्लाबोल केला आहे.
"न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जा, तुमच्याकडील पुरावे द्या. तिथं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, चुकीचं काही केलं नसेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही" असं देखील गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. "राऊतांनी शिवसेनेला फसवलं. उद्धव ठाकरेंना फसवलं आणि बाळसाहेबांना फसवलं. त्यांनी बाळासाहेबांच्या शपथा घेऊन शिवसैनिकांना फसवलं. त्याचं वाईट वाटतं. त्यांनी आपल्या सर्वांचं घर फोडलंय. त्यांच्यापासून सावध राहा असं शिवसैनिकांना आवाहन करतो" असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.
"राम मंदिरासाठी शिंदेंनी दिलेले पैसे राऊतांनी घरी ठेवले की काय?"
संजय शिरसाट यांनी "ईडीच्या लोकांना संजय राऊतांच्या घरी १० ते ११ लाख रुपये सापडले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय?" असं म्हटलं आहे. तसेच "जैसी करनी वैसी भरनी आहे. राऊत लोकांना नावे ठेवत होते. आता त्यांनाच तुरुंगात जावं लागलं आहे. आधीच दोन मंत्री तुरुंगात आहेत. आता हे तिसरे महाशय तिथे पोहोचले आहेत. राऊत तुरुंगात जाऊन दोन मंत्र्यांबरोबर युतीची गप्पा करणार की काय असं वाटतं" असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.