मुंबई – पुणे मेट्रोच्या उद्धाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात राजकीय वादंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांनी मेट्रो उद्धाटनावरून भाजपाला टोला लगावला त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांचे भाषण ऐकून मी अवाक् झालो. पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना शरद पवार हताशपणे बोलले असतील अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी केली.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवायची अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. पुणे मेट्रो उद्धाटनाचं निमंत्रण न मिळाल्याने ते हताश होऊन बोलले असतील. माझ्यासारखा धनगराचा पोरगा, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. यामुळेच पवारांचा फडणवीसांवर राग आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच बहुजनातील पोरं सत्तेच्या प्रवाहात आणले त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार निवडून राज्यातील जनतेने पुन्हा सत्तेत आणण्यासाठी निवडून दिले. परंतु आपल्या नेतृत्वात पावसात भिजूनसुद्धा फक्त ५४ आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हाला निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका असा टोलाही पडळकरांनी शरद पवारांना लगावला.
दरम्यान, आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी झगडणं, लढणं, हे महाकठीण आहे असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
संकट काळात राजकारण करायचं नसतं. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का?", असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं. तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली आहे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे असं शरद पवार म्हणाले होते.