परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:49 IST2024-12-26T19:47:35+5:302024-12-26T19:49:14+5:30

देशात हुकूमशाही सुरु असल्याचाही नाना पटोलेंनी केला आरोप

BJP government is not ready to accept the facts in Parbhani and Beed murder cases - Nana Patole | परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

Nana Patole, Maharashtra Politics : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. देशात हुकूमशाही सुरु असून सध्या देशात काय चालले आहे हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे. देशातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Web Title: BJP government is not ready to accept the facts in Parbhani and Beed murder cases - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.