जळगाव/धुळे/नंदुरबार : राज्यातील भाजपाप्रणित युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची त्यांची इच्छाच नाही, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणे नाही, असा निर्धार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी संघर्ष यात्रेच्या खान्देशातील सभेत व्यक्त केला. तर उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचे मॉडेल आम्हाला मान्य नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.खान्देशात रविवारी एरंडोल, पारोळा व अमळनेर (जि. जळगाव) आणि बेटावद, शिरपूर (जि. धुळे) तसेच शहादा आणि नंदुरबार (जि. नंदुरबार) येथे जाहीर सभा झाल्या. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण फडणवीस सरकार ३० महिन्यांत कर्ज माफ का करू शकले नाही? शासनाला गोहत्या चालत नाही, मात्र शेतकरी आत्महत्या कशी चालते, असा प्रश्न करत कर्जमाफीशिवाय आता थांबणार नाही, असा इशारा पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील सभांमध्ये दिला. आम्हाला कर्जमाफीचा ‘यूपी पॅटर्न’ मान्य नाही. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करुन १०० टक्के कर्जमाफी आम्हाला हवी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेटावद येथे जाहीर सभेत सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपा सरकार ‘फेकू’!
By admin | Published: April 17, 2017 2:41 AM