"दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, पण...", नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:07 PM2022-08-05T17:07:02+5:302022-08-05T17:07:34+5:30

Nana Patole : लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

"BJP government's attempt to crush the movement by repression", alleged Nana Patole, protest outside Raj Bhavan against Centre | "दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, पण...", नाना पटोलेंचा आरोप

"दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, पण...", नाना पटोलेंचा आरोप

googlenewsNext

मुंबई : देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराओ घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधान भवनातून आंदोलनासाठी जात असतानाच काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली. ईडी सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण अशा कारवायांना घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू, अशा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
 
आंदोलनानंतर गांधी भवनमध्ये नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसने देशभर आंदोलन करत असताना दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दंडेलशाही करत ताब्यात घेतले. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत आक्षेपार्ह व निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या पोलीसी दंडेलशाहीचा निषेध करत आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत सुद्धा आंदोलन करता येत होते. आपण लोकशाहीत आहोत पण राज्य सरकार जनतेच्या प्रश्नावरील आंदोलन करण्यापासूनही रोखत आहे. केंद्र सरकारने मुलांच्या दुधावर जीएसटी लावला, मीठ, पीठावरही जीएसटी लावला. महागाईने जनता त्रस्त असताना सरकारला जाब विचारायचा नाही का? हे कसले सरकार.. ED सरकारच्या राज्यात आंदोलन करण्यावरही बंदी आहे का? ब्रिटिशांच्या काळातही लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला बंदी नव्हती, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. 

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवन घेराओ व जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती, पण पोलिसांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली. महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

Web Title: "BJP government's attempt to crush the movement by repression", alleged Nana Patole, protest outside Raj Bhavan against Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.