कल्याण : एकीकडे आर्थिक चणचणीमुळे कंत्राटदारांची बिले, केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाची कसरत चालू असताना दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर मात्र लाखोंची उधळपट्टी झाली आहे. मात्र, या नूतनीकरण केलेल्या दालनांचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या दालनातील छताला पाण्याची गळती लागल्याने तेथील पीओपीचे मोठे नुकसान झाले आहे. वरच्या मजल्यावरील स्थायी समिती सभापतींच्या दालनातून ही गळती होत असल्याचे बोलले जात आहे. केडीएमसीच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना (५६ नगरसेवक), तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपा (४६ नगरसेवक) ठरला आहे. त्याखालोखाल मनसे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादीचे २ नगरसेवक आहेत. तळ मजल्यावर शिवसेनेचे गटनेते कार्यालय आहे. भाजपाचे पहिल्या मजल्यावर होते. मात्र, भाजपाचे नगरसेवक ९ वरून थेट ४३ पर्यंत वाढल्याने त्यांनी मोठे दालन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पहिल्या मजल्यावरील प्रशस्त अशा मनसेच्या दालनासह बाजूकडील सचिव कार्यालयाची काही जागा मागितली होती. त्यानुसार, त्यांना जागा देण्यात आली. मनसेला तळ मजल्यावरील काँग्रेसचे कार्यालय देण्यात आले. या दालनांसह भाजपाच्या गटनेते कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या दालनाला काही दिवसांतच गळती लागली आहे. छतातून पाणी झिरपू लागल्याने पीओपीचे नुकसान झाले आहे. पीओपी काढावे लागले असून पाण्याची गळती वरील सभापती दालनाच्या पाइपलाइनमधून होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाचे क निष्ठ अभियंता शैलेश मळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)>पाटील यांची नाराजीदालनावर लाखोंचा खर्च करण्यात आला असताना काही दिवसांतच हा प्रकार घडल्याने भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनीही महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपा गटनेत्यांच्या कार्यालयाला गळती
By admin | Published: March 07, 2017 3:36 AM