Pankaja Munde Reaction On Manoj Jarange Patil Agitation For Maratha Reservation: बीड प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले आणि सातत्याने महायुती सरकारला इशारा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे वळवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २५ जानेवारी २०२५ पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे हे सातवे उपोषण आहे. यासंदर्भात भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
काही दिवसांपासून महायुती सरकारचे पालकमंत्रीपद जाहीर झाले. जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पंकजा मुंडे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनासंदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला.
...तर निरोप पाठवून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देईन
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत. त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानाच्या चौकटीत बसवून त्यांच्या किंवा कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. माझा या जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. तसेच भाजपा खासदार आणि मराठवाड्यातील मराठा नेते अशोक चव्हाण यांनीही लवकरच उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारीला एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.