ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नौटंकी ठरवले आहे. नौटंकीलाही मर्यादा असतात आणि सर्वच नौटंक्या चालतातच असे नाही. तुफान गाजावाजा झालेले अनेक सिनेमे आणि नाटके पहिल्या प्रयोगालाच कोसळतात. मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजपच्या नाटक मंडळींनी ‘महाराष्ट्र भक्ती’चे नाटक रचले आहे. ते पडदा वर जाण्याआधीच पडले अशा बोच-या शब्दात उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे.
ज्यांनी अखंड महाराष्ट्राचा सदैव दुस्वास केला व महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करण्याचा विडाच उचलला आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्मारकावर पाय ठेवणे हा त्या लढय़ाचा आणि महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचा अवमान आहे. भाजपाने हुतात्मा स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी आपल्या उमेदवारांना घेऊन जाणे हे शतकातील सर्वात मोठे ढोंग आहे. ‘मूंह में राम आणि बगल में छुरी’ असाच हा सर्व प्रकार आहे असे उद्धव यांनी म्हटले आहे.
सध्याचे आपले मुख्यमंत्री व त्यांचे मंडळ महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याची भूमिका मांडतात. हे त्यांचे धोरण हुतात्म्यांच्या त्यागाचा अवमान करणारे आहे. हुतात्मा स्मारकावर जाऊन नतमस्तक होणा-या किती जणांनी ‘अखंड महाराष्ट्र टिकायलाच पाहिजे’ अशा घोषणा केल्या? मेंढरांना ट्रकात कोंबून खाटीकखान्याकडे न्यावे तसे या मंडळींना गाडयाघोडयांत कोंबून हुतात्मा स्मारकावर नेले व ‘महाराष्ट्राचे भक्त आम्हीसुद्धा आहोत बरे!’ असे सिद्ध करण्यासाठी हुतात्म्यांच्या पायाशी वाकवले, पण ‘महाराष्ट्रभक्त’ म्हणवून घेणे इतके का सोपे आहे! हेतूपूर्वक आचरण करण्याचे ते एक कठोर क्रत आहे असे उद्धव यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- जे लोक कमळाबाईंचा दुपट्टा घालून हुतात्मा स्मारकावर गेले, त्यातील किती लोकांना कमळाबाईंचे महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याचे धोरण मान्य आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर आताच हिमतीने सांगा की, आम्ही कमळाबाईंचा दुपट्टा गळय़ात बांधलाय खरा, पण आमचे इमान अखंड महाराष्ट्राशी! महाराष्ट्र धर्माशी आहे! या सर्व लोकांनी हुतात्मा स्मारकावर जावे हे पापच आहे. त्या पापाचा घडा भरणारच आहे, पण या मंडळींच्या नौटंकीने आज अखंड महाराष्ट्र राज्याचे हुतात्मा स्मारक अपवित्र झाले आहे आणि त्याचे प्रायश्चित्त त्यांना घ्यावे लागणार हे निश्चित आहे.
- नौटंकीलाही मर्यादा असतात आणि सर्वच नौटंक्या चालतातच असे नाही. तुफान गाजावाजा झालेले अनेक सिनेमे आणि नाटके पहिल्या प्रयोगालाच कोसळतात. भारतीय जनता पक्षाच्या नव्या नाटकाची तीच गत होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजपच्या नाटक मंडळींनी ‘महाराष्ट्र भक्ती’चे नाटक रचले आहे. ते पडदा वर जाण्याआधीच पडले. हुतात्मा स्मारकाची आठवण या मंडळींना झाली व मुंबईतील उमेदवाऱया ज्यांना मिळाल्या अशा मंडळींना घेऊन हे लोक मुंबईतील हुतात्मा चौकावर नतमस्तक होण्यासाठी गेले. खरे म्हणजे हे या शतकातील सगळय़ात मोठे ढोंग म्हणावे लागेल. ज्यांनी अखंड महाराष्ट्राचा सदैव दुस्वास केला व महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करण्याचा विडाच उचलला आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्मारकावर पाय ठेवणे हा त्या लढय़ाचा आणि महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचा अवमान आहे. ‘मूंह में राम आणि बगल में छुरी’ असाच हा सर्व प्रकार आहे. 105 हुतात्म्यांनी जो लढा संयुक्त महाराष्ट्रासाठी दिला तो लढा या ढोंगी नाटकवाल्यांना मान्य आहे काय? जे हुतात्मे झाले त्यांचा त्याग मुंबई, विदर्भ, मराठवाडा असा एक.
- अखंड महाराष्ट्र मिळावा म्हणून होता, पण सध्याचे आपले मुख्यमंत्री व त्यांचे मंडळ महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याची भूमिका मांडतात. हे त्यांचे धोरण हुतात्म्यांच्या त्यागाचा अवमान करणारे आहे. हुतात्मा स्मारकावर जाऊन नतमस्तक होणाऱया किती जणांनी ‘अखंड महाराष्ट्र टिकायलाच पाहिजे’ अशा घोषणा केल्या? मेंढरांना ट्रकात कोंबून खाटीकखान्याकडे न्यावे तसे या मंडळींना गाडय़ाघोडय़ांत कोंबून हुतात्मा स्मारकावर नेले व ‘महाराष्ट्राचे भक्त आम्हीसुद्धा आहोत बरे!’ असे सिद्ध करण्यासाठी हुतात्म्यांच्या पायाशी वाकवले, पण ‘महाराष्ट्रभक्त’ म्हणवून घेणे इतके का सोपे आहे! हेतूपूर्वक आचरण करण्याचे ते एक कठोर क्रत आहे. त्यासाठी आपल्या साऱया महत्त्वाकांक्षा सालपटाप्रमाणे फेकून द्याव्या लागतात. आपल्या भाषेच्या व भूमीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र दुश्मनांच्या रक्ताने हात माखून घ्यावे लागतात. आयुष्यभर केलेली कमाई, कीर्ती, मोठेपण हे सारे महाराष्ट्राच्या भल्याबु-याचा विचार करण्याच्या वेळी अनेकदा हसतमुखाने सोडून द्यावे लागते. आपला देश, आपला महाराष्ट्र, धर्मबांधव यांचा आपल्यावर अधिकार आहे याची जाणीव जागती ठेवावी लागते. अशी जाणीव व धगधगती ‘महाराष्ट्रभक्ती’या मंडळींच्या मनात गुंजभर तरी आहे काय?
- प्रत्यक्ष नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या नाकासमोर महाराष्ट्र दिनी काळे झेंडे फडकवणाऱया फोकनाड मंडळींना महाराष्ट्र राज्यात अधिकारपदाचे शेले-पागोटे द्यायचे व त्याच हातांनी संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांवर राजकीय स्वार्थापोटी फुले उधळायची हे ढोंग आहे आणि लफंगेगिरीचाही कळस आहे. या मंडळींनी एक प्रकारे हुतात्मा स्मारक अपवित्र केले. त्याचे शुद्धीकरण अशा ढोंगी लोकांच्या दारुण पराभवानेच होऊ शकेल. जे लोक कमळाबाईंचा दुपट्टा घालून हुतात्मा स्मारकावर गेले, त्यातील किती लोकांना कमळाबाईंचे महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याचे धोरण मान्य आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर आताच हिमतीने सांगा की, आम्ही कमळाबाईंचा दुपट्टा गळय़ात बांधलाय खरा, पण आमचे इमान अखंड महाराष्ट्राशी! महाराष्ट्र धर्माशी आहे! अर्थात असे जाहीर करणारा एकही माय का लाल त्यांच्या पक्षात निपजू नये याचे दुःख वाटते. या सर्व लोकांनी हुतात्मा स्मारकावर जावे हे पापच आहे. त्या पापाचा घडा भरणारच आहे, पण या मंडळींच्या नौटंकीने आज अखंड महाराष्ट्र राज्याचे हुतात्मा स्मारक अपवित्र झाले आहे आणि त्याचे प्रायश्चित्त त्यांना घ्यावे लागणार हेदेखील निश्चित आहे.