मुंबई : दक्षिण मुंबई मतदार संघातील शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार, माजी आमदार अतुल शाह यांच्या २२० प्रभागातील मतमोजणीदरम्यान दोघांचीही ५ हजार ९४६ मते आली. त्यानंतर, सुरेंद्र बागलकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतरही ‘सेम टू सेम’ मतसंख्या आल्याने, अखेर लॉटरीच्या माध्यमातून या प्रभागाचा निकाल लावण्यात आला. त्यात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांच्या पदरी पराभव आला, तर भाजपाचे माजी आमदार अतुल शहा यांची लॉटरी लागून त्यांचा विजय झाला.शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार आणि माजी आमदार अतुल शाह यांच्या प्रभागातील मतमोजणीच्या वेळी १३ फेऱ्यांनंतर दोघांचीही मतसंख्या समान होती. दोन्ही फेरमतमोजणीतही टाय झाल्याने, ईश्वरचिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ६व्या, ७व्या, ८व्या आणि ११व्या फेरमतमोजणीतही स्पष्ट निकाल आला नाही. १२व्या आणि १३व्या फेरीत बाजीच उलटली. त्यानंतर, काही काळात येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.फेरमतमोजणीनंतर झालेल्या बैठकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींचा आढावा घेऊन ईश्वरचिठ्ठीचा निर्णय घेतला. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी येथे हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काही काळाने खुद्द महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीत ईश्वरचिठ्ठी प्रक्रियेत यशिका भूषण साळुंके या चार वर्षांच्या मुलीच्या हस्ते काढण्यात आलेल्या लॉटरीत अतुल शाह विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘ईश्वरचिठ्ठी’चा कौलही भाजपालाच
By admin | Published: February 24, 2017 5:20 AM