लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी व सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून व आश्वासने देऊन सत्तेत आलेले भाजपा सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तीन वर्षांपासून केवळ काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा पोहोचविला जात आहे, अशी टीका मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते खा. के.एल. पुनिया यांनी येथे केली. सोमवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत पुनिया यांनी भाजपाने तीन वर्षांत कृषी क्षेत्रात केलेल्या कामांची चिरफाड केली. भाजपाने निवडणुकीपूर्वी खूप आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत येताच ते बदलले. आज शेतकऱ्यांची सर्वात वाईट स्थिती आहे. दररोज किमान ३५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून सर्वत्र मागणी होत आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. दुसरीकडे काही उद्योगपतीेंचे तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांसोबत भाजपाचे संगनमत असल्यानेच भाजप जाणीवपूर्वक हमीभावावर धान्य घेत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
‘भाजपाने केली शेतकऱ्यांची फसवणूक’
By admin | Published: May 23, 2017 3:00 AM