कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून राजेंद्र देवळेकर तर भाजपाकडून राहुल दामले यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी भाजपाकडून विशाल पावशे, विक्रांत तरे यांनी तर शिवसेनेकडून राजेश मोरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, शिवसेनेने पुन्हा एकदा महापौरपदासाठी कल्याणला पसंती दिल्याने डोंबिवलीकर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असून, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे हे रविवारी पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जाते. २००५ नंतर महापौरपदासाठी डोंबिवलीचा विचार झालेला नाही. त्यामुळे यंदाचे महापौरपद डोंबिवलीला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. यात शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांची नावे आघाडीवर होती. परंतु, यांच्यात उमेदवारी मिळण्यावरून सुरू असलेली स्पर्धा पाहता पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा कल्याणला पसंती दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख विजय साळवी यांच्यासह अन्य नवनियुक्त नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे महापौरपदासाठी स्पर्धेत असलेले रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे हे दोघेही या वेळी अनुपस्थित होते. भाजपाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार आदींसह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेचे प्रभारी सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी १२ वाजता महापौरपदाची निवडणूक होत आहे. त्यात दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर कोणाचा, याबाबतची उत्कंठा कायम आहे. (प्रतिनिधी)पुंडलिक म्हात्रे देणार पदाचा राजीनामामहापौरपदासाठी कल्याणला पुन्हा एकदा पसंती दिल्याने पक्षाचे उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी उघड झाली आहे. त्यांचे पुत्र दीपेश हे महापौरपदाच्या स्पर्धेत होते. त्यांना डावलले गेल्याने म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असताना माझी प्रकृती सध्या बरी नसल्याने पदाला मी न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे पदाचा राजीनामा दिल्याचा दावा ते करीत आहेत, असे ते म्हणाले. दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे हेदेखील नाराज असून डोंबिवलीला महापौरपद मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, पक्षश्रेष्ठींचा आदेश मला मान्य असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मनसेने काढला व्हिप : मनसेने व्हिप काढून सदस्यांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले असल्याचे पक्षाचे नेते राजू पाटील यांनी सांगितले.
सेनेसह भाजपाचाही उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: November 08, 2015 12:34 AM