अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:34 PM2024-02-08T16:34:28+5:302024-02-08T16:35:11+5:30
Maharashtra Politics Opinion poll 2024 Loksabha election Latest: ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात भाजपाने ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. असे असले तरी ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे. या दोन्ही आघाडी-युतींच्या जागावाटपाचे फॉर्म्युले अद्याप ठरायचे आहेत. तसेच मविआमध्ये आंबेडकर तर एनडीएमध्ये मनसेची एन्ट्री होणार का, हे ठरायचं आहे. असे असले तरी अजित पवारांना सोबत घेऊन, शरद पवारांचा पक्ष फोडून देखील भाजपाला मविआवर वरचढ ठरणे कठीण जाणार, असे आकडेवारी सांगत आहे.
कालच्या टाईम्स नाऊ-मॅट्रीझच्या सर्व्हेत लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपा-अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ३९ जागा मिळताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ९ जागा मिळताना दिसत आहेत. परंतु, आजचा नवा सर्व्हे भाजपाचसह शिंदे- अजितदादांचे टेन्शन वाढविणारा दिसत आहे.
हा नवा सर्व्हे वाचा... आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+
२०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंची पूर्ण सेना सोबत असल्याने एनडीएने ४१ जागा जिंकल्या होत्या. यात भाजपाने २२ आणि उद्धव ठाकरेंच्या पूर्ण शिवसेनेने १९ जागा जिंकल्या होत्या. आज जर महाराष्ट्रात लोकसभानिवडणूक झाली तर मविआला ४८ पैकी २६ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपा महायुतीला २२ जागा मिळताना दिसत आहेत.
मविआला पक्षाच्या जागा वेगवेगळ्या केल्या तर काँग्रेसला १२, शिवसेना उद्धव गट आणि एनसीपी शरद पवार गटाला १४ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपा युतीला ४०.५ टक्के मते तर मविआला ४४.५ टक्के मते मिळताना दिसत आहेत.