जालना : पाच-सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत सत्ता मिळविली होती. मात्र, शत प्रतिशत भाजपाच्या मोहिमेखाली याच नेत्यांना पक्षप्रवेश देण्यात आले. यामुळे विरोधकांनी आता डागाळलेले नेते कसे चालतात, त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा सवाल उपस्थित केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा प्रथम क्रमांक आहे.
भाजपाकडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेआधी तर भाजपमध्ये मेगा भरती होती. मात्र, या भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना खुद्द आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष प्रवेश देत उमेदवारीचीही माळ गळ्यात घालत असल्याने भाजपवर टीका होत होती. यावर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेताना त्यांच्यावरील आरोपांची, गुन्ह्यांची पडताळणी करूनच घेत असल्याचे सांगितले होते. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी कोणती पावडर असल्याचे विचारले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे डॅशिंग रसायन असल्याचे उत्तर दिले होते. यावर सुळे यांनी या घातक रसायनापासून सावध रहा असा इशारा पक्षबदलू नेत्यांना दिला होता.
राज्यात युती असल्याने बहुतांश ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवर भाजपाने भरती चालविली होती. मात्र, या नेत्यांनी भाजपात घेताना त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर नारायण राणेंसारखे अनेक नेते अद्यापही आश्वासन पूर्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच भरती थांबविल्याचे जाहीर केले होते.
आता भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांबाबत वक्तव्य केले आहे. भाजपामध्ये अशा नेत्यांनी घेण्याचे त्यांनी समर्थन केले आहे. भाजपकडे वॉशिंग मशीन आहे; पक्षात एखाद्याला घेण्याआधी त्या नेत्याला या मशीनमध्ये धुतले जाते. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर असल्याचे वक्तव्य जालना मध्ये केले.