मुंबई - एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देसमची भूमिका अपेक्षिक होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तेलुगू देसम पक्षाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. तर दुसरीकडे, एनडीएच्या पूर्वीच्या नेत्यांनी आघाडी कायम राहावी म्हणून प्रयत्न केले होते. पण भाजपा आता ओव्हरकॉन्फिडन्ट झाली आहे, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी म्हंटलं.
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार असल्याचं आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (7 मार्च) घोषणा केली होती. तेलुगू देसमच्या या निर्णयानंतर शिवसेनेने हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला हे अपेक्षितच होतं. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडले आहेत. घटक पक्षांशी भाजपाचे चांगले संबंध राहिलेले नाहीत.त्यामुळे हळूहळू उर्वरित घटक पक्षही बाहेर पडतील, असं संजय राऊत यांनी म्हंटलं.
तेलुगू देसमच्या आधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. भाजपाने आता तरी यावर विचार करावा. एनडीएच्या आधीच्या नेत्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती. पण त्यांना आता अतिआत्मविश्वास आहे. २०१९ हे वर्ष भाजपासाठी खूप आव्हानात्मक असेल, असं प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी म्हंटलं आहे.