मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. तसेच यादरम्यान, भाजपानेविदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात भाजपाने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बड्या नेत्याला आपल्या गोटात आणून या भागात आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी आज आपल्या समर्थकासंह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत त्यांनी उपस्थित राहून भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी वित्तमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे आदी उपस्थित होते. एकेकाळी भाजपमध्ये मोठे नेते असलेले महादेवराव शिवणकर यांचे विजय शिवणकर हे पुत्र आहेत.
दरम्यान, काल भाजपाला विदर्भामध्ये धक्का बसला होता. वर्धा जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीश गोडे यांनी भाजपाला रामराम ठोकत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच विदर्भामधील काही जिल्ह्यांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.