मुंबईः भाजपात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. जिंकल्यावर जसे हार मिळतात, तसेच पराभव झाल्यानंतर चार शिव्याही खाव्या लागतात. भाजपामध्ये मी माझा गट तयार केला नाही. भाजपामध्ये माझा एकही आमदार नाही, भाजपाचे जेवढे आमदार आहेत ते सर्व माझे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पंकजाताईंच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो. मुंडेसाहेब गेल्यानंतर पंकजाताईंना आम्ही कोअर कमिटीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर त्या मंत्री झाल्या, मंत्री असतानाही त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाची खाती होती. ग्रामविकास होतं आणि महिला बालविकास खातं त्यांच्याकडे होतं. त्यांना टार्गेट करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभा राहिलो. मुंडे साहेबांबद्दल आम्ही केलं होतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदराची भावना आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे.मुंडेसाहेबांचं स्मारक आम्ही बांधलं नाही, असं खडसे म्हणाले, पण ते अत्यंत चुकीचं आहे. खडसेंना उद्धव ठाकरेंकडे जाऊन स्मारकासाठी पैसे मागण्याची गरज नव्हती. मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी आमच्या सरकारनं 46 कोटी रुपये मंजूर केले होते. मुंडेंच्या स्मारकाचं लेटर ऑफ एक्स्पेटन्स हे निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वीचं आहे. उद्धव ठाकरेंनी जर स्थगित केलं असेल तर जावं लागेल. दिल्लीत गेले होते, तेव्हा भूपेंद्र यादव त्यांच्याशी बोलले, यादवांनी त्यांना नड्डांशी भेट घडवून देण्याचं सांगितलं होतं. त्यांच्या मुलीला पक्षानं तिकीट दिलेलं होतं. त्यांना तिकीट का नाकारलं हे केंद्रीय नेतृत्वच सांगू शकेल. दरवर्षी मी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मी जातो, जयंतीच्या कार्यक्रमाला ते इतरांना बोलवतात.
भाजपात मी माझा गट केला नाही; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 8:51 PM