भाजपच्या सर्व्हेत "वंचित" वंचितच !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:43 AM2019-07-29T11:43:22+5:302019-07-29T11:43:38+5:30
लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित बहुजन आघाडी विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यानुसार विविध पक्षांच्या युत्या आणि आघाड्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जागा वाटपावरून आघाडीत चर्चा सुरू आहे. मात्र युतीत अद्याप जागा वाटपावर फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. राज्यातील अनेक विधानसभा मतदार संघात भाजप शिवसेनेच्या पुढे दिसत आहे. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. यामध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे देखील टेन्शन वाढले आहे. तर नव्याने उदयास आलेला वंचित बहुजन आघाडी पक्षही चिंतेत आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुनज आघाडीने मोठ्या प्रमाणात मते घेतली. दलित आणि मुस्लिमांना एकत्र करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आंबेडकारांचा प्रयोग चांगलाच गाजला. परंतु, खुद्द प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदार संघातून पराभव पत्करावा लागला. लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान नुकताच भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. यामध्ये भाजपला स्वबळावर बहुमत म्हणजेच १६०, शिवसेनेला ९० आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजप-शिवसेना युतीला २३० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आघाडीला ५८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व्हेमध्ये वंचित बहुनज आघाडी आणि मनसेला एकही जागा दाखविण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व्हेत वंचित आणि मनसेचा उल्लेखच नाही की, या दोन्ही पक्षांना भोपळाही फोडता येणार नाही, याविषयी स्पष्ट उल्लेख नाही.