भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर...; रोहित पवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:58 AM2024-09-10T10:58:02+5:302024-09-10T11:05:58+5:30

या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला. 

BJP internal survey, offer to Ajit Pawar...; Big claim of NCP MLA Rohit Pawar | भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर...; रोहित पवारांचा मोठा दावा

भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर...; रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवाच भाजपाचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यात अजित पवारांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे गटाला १७-२२ जागा आणि भाजपाला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यानं भाजपामध्ये भीती पसरलीय, त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवारांनी ट्विटरवरून म्हटलंय की, भाजपाच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय असं त्यांनी म्हटलं आहे. 

त्याशिवाय कर्जत जामखेड संदर्भात कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला. 

भाजपा मैत्रीपूर्ण लढतीसाठी इच्छुक?

महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजपा नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते. याबाबत 'द हिंदू' या दैनिकाने वृत्त दिलं आहे.

अमित शाहांचाअजित पवारांना शब्द

शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली. त्याबाबत सुनील तटकरेंनी माहिती दिली की, अमित शाह यांच्यासोबत रविवारी रात्री केवळ भाजप नेत्यांची ती बैठक होती. त्यात वावगे काहीही नाही, पण वेगवेगळ्या अफवा उगीच पसरविल्या जात आहेत. जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. त्या आधी आम्ही तिन्ही पक्ष चर्चा करू. मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला आजच्या चर्चेत दिला आहे असं त्यांनी सांगितले. 
 

Web Title: BJP internal survey, offer to Ajit Pawar...; Big claim of NCP MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.