मुंबई : शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.पवार यांनी यावेळी राष्ट्रीय पक्षांची यादीच सोबत आणली होती. शिवाय, या बंडामागे भाजप नेत्यांचा हात दिसत नसल्याचा अजित पवार यांचा दावाही शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. महाराष्ट्रातील स्थितीची त्यांना कल्पना असली, तरी गुजरात आणि आसाममधील गोष्टींची आम्हाला जास्त माहिती असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.बंडाळीनंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय स्थितीसंदर्भात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित हाते. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडामागे भाजपचा हात नसल्याचे विधान अजित पवार यांनी स्थिती पाहून केले असावे. ज्या लोकांनी आसाम व गुजरातमध्ये शिंदे यांची व्यवस्था केली, त्याची आम्हाला माहिती आहे. देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यापैकी भाजप वगळता अन्य कोणीच शिंदेंना समर्थन देण्याची शक्यता नाही. अनेक बंडखोर आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम हा त्यांच्यावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
बहुमतासाठी सभागृहात यावेच लागेल-सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल. आसाममध्ये बसून ते करता येणार नाही. - जेव्हा हे आमदार विधिमंडळाच्या प्रांगणात दाखल होतील तेव्हा आता त्यांना गुजरात आणि आसाममध्ये साहाय्य करणारी मंडळी पोहोचू शकणार नाहीत, असा इशाराही पवार यांनी दिला.
या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकार विरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सरकार स्थिर आहे...अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आहे. या परिस्थितीवर मात करून हे सरकार व्यवस्थित सुरू राहील आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे, हे संपूर्ण देशाला कळेल. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचे ठिकाण विधानसभा आहे. विधानसभेत अविश्वास ठराव घेतल्यानंतर लक्षात येईल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले : परिणाम भोगावे लागतीलज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्यासोबत १२ ते १६ लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला. बाकी त्याला काही अर्थ नाही, असे पवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम कामगिरी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसला म्हणणे, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद येथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीने नेले ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल, असेही पवार म्हणाले.