मुंबई : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकच पक्ष राहील, असे विधान केले होते. त्यानंतर आता एका मुलाखतीत नड्डा यांनी भाजप स्वयंपूर्ण झाला आहे. आता त्यांना आरएसएसची गरज नाही, असे म्हटले आहे. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला, त्या संघाला भाजप नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १००वे वर्ष धोक्याचे असून, भाजप आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो, अशी टीका उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
मविआच्या वतीने शनिवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा, हे काम भाजप करीत आहे. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे.
मोफत धान्याची याेजना यूपीएचीच : शरद पवारइंडिया आघाडीचे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे यात तथ्य नाही. यूपीए सरकारनेच ही योजना आणली होती. डॉ. मनमोहनसिंह सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणला व त्याअंतर्गत ही योजना आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत सावरकर हा मुद्दा नाही. त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील, असेही पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.