भाजपने २०२४ ची तयारी सुरु केली आहे. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपाने वेगवेगळ्या मोहिमा सुरु केल्या आहेत. यापैकी एक असलेल्या पक्ष विस्ताराच्या मोहिमेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा महासागर असल्याचे म्हटले आहे.
30 मे ते 30 जून याकाळात आम्ही जनसंपर्क अभियान चालवत आहोत. केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही राज्यातील तीन कोटी कुटुंबांना संपर्क करणार आहोत. हे आमचे घर चलो अभियान आहे, असे बावनकुळे म्हणाले.
आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातले नेतृत्व आले तरी आमच्याकडे खूप जागा आहे. आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडी सारख्या नऊ आघाड्या आहेत. 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या आहेत. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे चांगली स्पेस आहे. ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचे असेल, माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे, आम्ही महासागर सारखे त्यांना सामावून घेऊ, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाष्यपंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केलेला आहे. मी त्यांचा संपूर्ण भाषण ऐकलेला आहे. पंकजा यांनी भाजप बद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत. पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी नेहमी संपर्कात असतो. त्या थोडही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असं मला वाटते, असे बावनकुळे म्हणाले.
सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींसाठी काहीही केलेले नाही. म्हणून आज त्यांना ओबीसी मेळावे घ्यावे लागत आहेत. मोदी यांच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ओबीसी यांच्या आरक्षणाचा तिढा सुटला. अजित पवारांनी तर त्या संदर्भातील निधीची फाईल फेकून दिली होती, अशी टीका बावनकुळे यांनी केली.