"जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा ऐरणीवर", काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:56 PM2023-03-28T19:56:41+5:302023-03-28T19:58:42+5:30
Nana Patole Criticize BJP: जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे
मुंबई - भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे परंतु या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणारे साहित्य, खत, बि-बियाणे महाग झाले आहे. कोणत्याच घटकाचा विकास मोदी सरकार करु शकले नाही. या मुळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.
राहुल गांधी हे सातत्याने नरेंद्र मोदी यांना जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारत असतात. राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत, जे मोदी सरकारच्या कारवायांना न डगमगता ताठ मानेने तोंड देत आहेत. भाजपाने राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे, सर्व यंत्रणा सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या आहेत, याविरोधात लढा देण्याची गरज असून राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान वाचवण्यासठी लढत आहेत आणि ही लढाई आम्ही लढत राहु, असेही नाना पटोले म्हणाले.