मुंबई - राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतरात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिवसेनेच्या पडलेल्या फुटीमुळे मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. इतकेच नाही तर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्नही उपस्थित झाला. याचे कारण म्हणजे शिवसेनेच्या तब्बल ५५ पैकी ४० आमदारांनी आणि १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिंदे-ठाकरे संघर्षावर दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली.
मात्र ठाकरेंविना शिवसेना चालवणं आता एकनाथ शिंदेंसमोर सगळ्यात मोठे आव्हान आहे. भाजपासोबत शिवसेना राज्यातील सत्तेत आहे. त्यात मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडे आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीला १ वर्ष शिल्लक असताना शिवसेना-भाजपा किती जागा लढवतील यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?२०२४ च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही १५०-१७० येतील. पण आपण २४० जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे ५० जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. २४० जागा लढल्या तर अशावेळी तुम्हाला तुमची टीम अलर्ट करावी लागेल. तुम्हाला खूप काम आहे असं विधान बावनकुळेंनी प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केले आहे.
भाजपाची सारवासारव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी असं विधान केल्याचं म्हटलं अशी सारवासारव नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र भाजपाचा हा अंतर्गत कार्यक्रम होता. त्यात माध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान हे भविष्यात या युतीचं चित्र कसं असू शकते हे स्पष्ट करणारे दिसते.
विरोधकांना आयतं कोलीतअद्याप विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसलेल्या जबाबदार व्यक्तीने केलेले विधान निश्चित भविष्यातील युतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट करणारे आहे. त्यात बावनकुळेंच्या विधानाचा आधार घेत विरोधकांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची कोंडी करण्यात येऊ शकते. बावनकुळेंचे विधान विरोधकांना शिंदेविरोधात मिळालेले आयतं कोलीत असल्याचंही म्हटलं जात आहे.