मुंबई: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticizes uddhav thackeray over tauktae cyclone)
तौक्ते चक्रीवादळाचा ठाणे जिल्ह्यासह कोकणाला मोठा फटका बसला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहे. अनेक तास वीज गायब आहे. आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहेत. तसेच अनेकांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज
अलीकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो
मंगळवारची सकाळ उजाडली. सीएमसाहेबांना जाग आली आणि ते हॉलमध्ये आले. अलीकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो. डायनिंग रूम, तिथून लिव्हिंग रूम, कधीतरी कॉन्फरन्स रूम... पायाला भिंगरी लागल्यागत सीएमसाहेब फिरत असतात. आज सवयीप्रमाणे अगोदर डायनिंग रूम मध्ये न जाता साहेबांनी प्रवासाची दिशा वळवली आणि प्रोटोकाल धावपळ उडाली. हटलमधल्या स्टाफला कोणतीच पूर्व सूचना नसल्याने तेथील कर्मचारीही भांबावून गेले. तिकडे लक्ष न देता सीएमसाहेब आपल्या खुर्चीत बसले. खुर्चीच्या हातावर कोरलेल्या लाकडी सिंहांना कुरवाळत त्यांनी एक जांभई दिली. रात्री बराच वेळ आढावा बैठक सुरू होती. सारी माहिती मिळाल्यावर, संकटग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा असे आदेश देऊनच सीएमसाहेब झोपी गेले. सीएमसाहेबांनी आदेश दिल्यामुळे संकटग्रस्त भागात पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू झाली.
तिकडे संकट वाढतच होते
तिकडे संकट वाढतच होते. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती, भेदरलेली मुलंबाळ कोपऱ्यात बसून बाहेरचं तांडव पाहात होती. संकटग्रस्त भागातील आढावा बैठक बराच वेळ सुरू होती. सकाळी सीएमसाहेबांना रिपोर्ट पाठवायची जबाबदारी एकावर सोपवून सर्वांनी डिनर घेतले, आणि ते घरोघर परतले. सीएमसाहेब हॉलमध्ये येताच त्यांच्या स्पेशल सीईओने कानाजवळ जाऊन काही सल्ला दिला, आणि साहेब गंभीर झाले. खुर्चीच्या हातावरच्या सिंहाना कुरवाळणे थांबवून ते मनगटातलं धाग्याचं बंधन पिरगळू लागले. आता साहेब काहीतरी महत्वपूर्ण बोलणार हे सीईओने ओळखले होते. त्याने तातडीने खूण केली, आणि साहेबांसमोरच्या टीपॉयवर लॅपटॉप सुरू झाला. सीईओने पलीकडे संकटग्रस्त भागात एका अधिकाऱ्यास फोन लावून संकटग्रस्त नागरिकांस तातडीने ऑनलाइन आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
YouTube कडून महिन्याला ‘इतके’ पैसे मिळतात; नितीन गडकरींनी सांगितला कमाईचा आकडा
स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले
काही क्षणांतच सीएमसाहेबांच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर संकटग्रस्त नागरिक मोठ्या अपेक्षेने सीएमसाहेबांकडे पाहात होते. सीएमसाहेबांनी चेहरा अधिक गंभीर केला, आणि ते बोलू लागले... 'या संकटात मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून संकटाच्या छाताडावर पाय देऊन त्याला, पळवून लावले आहे. मदतीसाठी मी केंद्राला आजच पत्र पाठव्णार आहे. माझ्या कोकणाचे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही'... असे बोलून सीएमसाहेबांनी हात उचलला. स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले होते. साहेबांनी मायेने स्क्रीनवरील त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याचे स्क्रीनवरील अश्रू पुसले, आणि आभासी सांत्वन आटोपून सीएमसाहेब नव्या आभासी आढावा बैठकीसाठी तयार झाले. उठताउठता सीईओकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले, व म्हणाले, संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तिकडे जावे लागत नाही. मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला मायेचा स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय... सीईओने मान हलवून कौतुकाने साहेबाकडे पाहिले. तिकडे ऑफिसमधून प्रेसनोट जारी झाली होती, 'मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले!', असा टोला केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला.