Keshav Upadhye : "महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; उद्धव ठाकरेंकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:14 AM2023-06-22T11:14:34+5:302023-06-22T11:22:06+5:30
BJP Keshav Upadhye : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं बुधवारी आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. गेल्या काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा असलेल्या अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच यावेळी मला विरोधी पक्षनेतेपद कधीच नको होतं. मला या जबादारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, असं सांगत अजित पवार यांनी हा मेळावा गाजवला. यावरून भाजपाने आता जोरदार निशाणा साधला आहे.
"महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; उद्धव ठाकरेंकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाविकास आघाडी नव्हे, ही तर आता महाहताश आघाडी! अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद नकोसे झाले आहे. नाना पटोले यांचे अध्यक्षपद पार्टीतच सर्वमान्य नाही आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता आणि भाषा काय तर मा. मोदीजींना हरवण्याची!" असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी नव्हे, ही तर आता महाहताश आघाडी !@AjitPawarSpeaks यांना विरोधी पक्षनेते पद नकोसे झाले आहे.@NANA_PATOLE यांचे अध्यक्षपद पार्टीतच सर्वमान्य नाही.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 22, 2023
आणि@OfficeofUT यांच्याकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता !
आणि भाषा काय तर मा. मोदीजींना हरवण्याची !
"विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्यात कुठलाही रस नव्हता"
अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी ते पक्ष संघटनेत जबाबदारी न मिळाल्याची सल व्यक्त करताना म्हणाले की, "मला स्टेजवरच्या मान्यवरांना आणि तुम्हाला एवढंच सांगतायचं आहे की, आता मी इतकी वर्षं सगळीकडे काम केलं. मला विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्यात कुठलाही रस नव्हता. परंतु आमदारांनी आग्रह केला, सह्यांची मोहीम राबवली. त्यामुळे वरिष्ठ म्हणाले की, तू तयार हो, त्यामुळे मी विरोधीपक्ष नेतेपद स्वीकारले."
"माझ्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी द्या"
"आता एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं आहे. पण आता बस झालं, मला आता विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. माझ्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. मग कशा पद्धतीने पक्ष चालतो ते पाहा. पण हे सर्व वरिष्ठ नेतेमंडळींवर अवलंबून आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडली आहे. आता कुठलंही पद द्या. तुम्हाल जे योग्य वाटेल ते पद द्या. त्या पदाला न्याय कसा देतात हे दाखवून देईन" असे अजित पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली होती. पवारांची ही घोषणा म्हणजे अजित पवार यांना दिलेला धक्का असे मानले जात होते. तसेच आता अजित पवार पुढे काय पाऊल उचलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.