राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर य़ावरून निशाणा साधला आहे. "भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय....!" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. "ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?" असा खोचक सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? #मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी. श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी?" असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"