काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशातून भारत सरकारवर निशाणा साधला आहे. युरोप दौऱ्यावर असलेले राहुल गांधी पॅरिसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया-भारत वाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ज्यांना एखाद्या गोष्टीचे नाव बदलायचं आहे, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का?" असा सवाल विचारत हल्लाबोल केला आहे.
'भारत' शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे."
"मोदीजींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदीजींची कल्पनाशक्ती सुरू होते, यातच काय ते आले. राहुल गांधीनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या 'भारत जोडो' यात्रेबद्दल म्हणे माहिती दिली. 'भारत' शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? 'इंडिया जोडो' म्हणा ना!" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल यांनी आपल्या राज्यघटनेत 'इंडिया म्हणजेच भारत' अशी व्याख्या करण्यात आली आहे. या राज्यांना एकत्र करुन इंडिया किंवा भारत बनला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यांमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. त्यांचा आवाज ऐकला जातो, कुणाचाही आवाज दाबला जात. मी गीता, उपनिषदे आणि इतर अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष (भाजप) जे काही करत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. नाव बदलणारे लोक इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका केली आहे.