देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत ते बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
फडणवीसांच्या पत्रावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने त्यांना इतर नेत्यांच्या घोटाळ्यांची आठवण करुन दिली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन फडणवीसांच्या पत्रावर अरे बापरे... अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, पिते दुध डोळे मिटुनी, जात मांजराची.. असंही म्हटलं आहे. संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने आता उडवली खिल्ली उडवली आहे.
"देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून स्पष्ट भूमिका मांडली, यावर तुमचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सत्तेसाठी तुम्ही काय-काय केलंय आणि करताय, हे सगळे बघतोय" असं म्हणत खोचक टोला लगावला. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. "मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची... सरावल्या हातांनाही कंप का सुटावा..." असं म्हणत हल्लाबोल केला. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"अहो, संजय राऊत मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी पत्र लिहून स्पष्ट भूमिका मांडली, यावर तुमचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. मुळात ‘सत्तेपेक्षा देश महत्वाचा’ हे वाक्यच तुमच्या पचनी न पडणारे आहे, कारण सत्तेसाठी तुम्ही काय-काय केलंय आणि करताय, हे सगळे बघतोय. एवढी वैचारिक गुलामगिरी पत्करली की, टिपू सुलतानचे गोडवे गायला लागले…तुम्ही लिहिलेल्या ओळीच्या पुढची ओळ एकदा वाचा... खास उबाठा गटासाठीच आहेतमनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची... सरावल्या हातांनाही कंप का सुटावा..." असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.