सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर सातत्याने टीका करण्यात येते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. यावरून भाजपाने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
"भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॉर्म्युला आहे…" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद असल्याचं देखील म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॉर्म्युला आहे… सामनाची अवस्था संजय राऊतांनी त्यांच्या वक्तव्यांसारखीच म्हणजेच फेक न्यूज फॅक्टरीसारखी करुन ठेवली आहे…"
"तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद आहे, तसे लिखाणही सामनामधून होत आहे… भारतीय जनता पार्टीने जयंत पाटलांना कोणताही प्रस्ताव देण्याचा काही संबंधही नाही. केवळ चौकशीच्या मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हा खोटा दावा केला जातोय… संजय राऊत आधी पवार साहेबांचे प्रवक्ते होते… ते आता जयंत पाटलांनाही डिपेंड करताहेत… याचाच अर्थ आता राऊत राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते झाले आहेत…" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
"केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत" असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.