मुंबई - भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा पुरता फाटल्याने त्यांचा भेसूर चेहरा समोर आला असून, विकृत, विखारी अन् गळेकापू राजकारण भाजप करीत असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील प्रचंड जाहीर सभेत केला. देवेंद्र फडणवीसांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, तीच त्यांच्या मालकांची इच्छा आहे; पण तुमच्या मालकासकट कोणीही आले तरी हौतात्म्य पत्करून मिळविलेल्या मुंबईचे लचके तोडणाऱ्यांचेच तुकडे होतील, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर आता भाजपानेशिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"सत्तेची धुंदी, पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीणच आहे. त्यामुळे तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "देवेदेंजींनी गोरेगावच्या सभेतून शिवसेनेची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उरली सुरलीही काढून घेतली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही असं सांगत उद्धव ठाकरेंच्या ‘टोमणे बॉम्ब’चा फुसका ठरवला. मुळात शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे."
"बाळासाहेबांचे स्वप्न औरंगाबादचं संभाजीनगर झाल्याचं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी नामांतराची गरजच काय म्हणत बाळासाहेबांच्या स्वप्नाचा अपमान केला. ‘सामना’वीरांनीही उद्धव ठाकरेंचे टोमणे असल्याचं खुद्द अग्रलेखात मान्य केले आहे. सत्तेची धुंदी आणि पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीणच आहे. त्यामुळे तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार आहे. #शिवसेना #भाजपा #बाळासाहेब_ठाकरे #संभाजीनगर #सामना #देवेंद्रफडणवीस #टोमणे #टोमणेबॅाम्ब" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच सामनावीरांनाही_टोमणेसभा_मान्य आणि बाळासाहेबांच्या_स्वप्नांचा_अपमान हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.