शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. यानंतर आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
"मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले" असं म्हणत भाजपानेउद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही म्हणणाऱ्या युवराजांचा पक्ष, चिन्ह इतिहासात जमा"
मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही... आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार आहे... संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!" असं आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"