मुंबई - केंद्र सरकारने कोट्यवधी गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे. गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई या विषयावरील चर्चेमध्ये सुळे यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहेत असं सुळे यांनी म्हटलं आहे.
सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे. यावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. 'ताई, मन मोठं करा! अजितदादा तुमचं तरी ऐकतात का पाहू?' असं म्हणत भाजपानेसुप्रिया सुळे यांना टोमणा मारला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
"सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू?" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.