मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसेच शिवसेनेकडून एक पोस्टर ट्विट करण्यात आलं आहे. घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं म्हणत सभेला यायलाच पाहिजे, असं ट्विटमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल" असं म्हटलं आहे. तसेच केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्वीटमध्ये "महाराष्ट्रात येऊन औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून त्यांनी त्यांची विचारधारा स्पष्ट केलीय. ज्या छत्रपती संभाजी राजांना हाल हाल करून मारण्यात आलं. आज 14 मे सिंहाचा छावाच असलेल्या शंभू राजांची जयंती. गेल्या अनेक वर्षापासून हिंदूंच्या मनात जी भावना होती औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण व्हावं" असं म्हटलं आहे.
"बाळासाहेबांची देखील तिच इच्छा होती. आज त्यांचे चिरंजीव राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी मुंबईतील सभेची जाहिरातबाजी केली आहे. या सभेत मर्द, वज्रमूठ, गदाधारी, खंजीर असे शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल. अन्यथा हिंदुत्वावरील आपले पुरोगामी विचार ऐकण्यासाठी कुठल्याही हिंदु बांधवांना येण्याची गरज नाही" असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपानेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे. याआधी देखील सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन भाष्य करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे भाषणातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहे. मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा म्हणू, असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्य, केंद्र सरकार, सतत वाढणारी महागाई, केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील आगामी निवडणुका, असे विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करतील, असं सांगण्यात येत आहे.