मुंबई - भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच अनिल परब (Anil Parab) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत गुंतलेत की, त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?, मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का?" असा सवाल देखील उपाध्ये यांनी केला आहे. यासोबतच "महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) च्या 306 कर्मचाऱ्यांचा कोविडमध्ये मृत्यू, 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण ठाकरे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. तसेच "शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय" अशा शब्दांत टोला लगावला आहे.
"मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का?"; भाजपाचा हल्लाबोल
"मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे NCP मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे" असं देखील केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी उपाध्ये यांनी "लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत निशाणा साधला होता. "अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली असून त्याला ॲडमिट केले आहे. लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं होतं.