मुंबई - राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबईची मेट्रो थांबविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता गावाकडची एसटीदेखील थांबवून दाखविली" अशा शब्दांत उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "ठाकरे सरकार जनतेचे आणखी किती हाल करणार?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "मुंबईची मेट्रो थांबविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता गावाकडची एसटीदेखील थांबवून दाखविली. या सरकारची ओळख एकच ती म्हणजे 'सरसकट गैरसोयींचा विकास करणारे महावसुली सरकार' हे सरकार जनतेचे आणखी किती हाल करणार?" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे.
शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. सध्या 250 बस आगार पैकी 160 बस डेपो बंद आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठक होणार आहे. याशिवाय, एसटीचा प्रश्न आता न्यायालय गेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे.
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात ST कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. 29 ऑक्टोबरला औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आदेश दिले होते. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासोबतच अनेक दुर्देवी घटना घडत आहेत. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.