"मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना..."; भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:46 PM2024-08-09T13:46:25+5:302024-08-09T13:49:48+5:30

"तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमके पदरी तरी काय पाडून घेतले?", असाही ठाकरेंना सवाल

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over Delhi Visit to congress high command Maharashtra Politics | "मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना..."; भाजपाची बोचरी टीका

"मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना..."; भाजपाची बोचरी टीका

BJP slams Uddhav Thackeray, Maharashtra Politics: उद्धव ठाकरे काही दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. उद्धव बाळासाहेर ठाकरे गटाच्या दिल्ली वारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण 'उबाठा'च्या हातीही धुपाटणेच आले. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगिरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले आहे, अशा खोचक शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी बोचरी टीका केली.

"महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव.. ना रस... ना गोडवा. मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून, 'ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री' असे सांगून ठाकरे यांची निराशा केली. तसेच जागावाटपातही काँग्रेस मोठा भाऊ असणार, असा स्पष्ट संदेशच दिल्लीवारीतून उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने दिल्याने उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला," असे उपाध्ये म्हणाले.

"विधानसभेसाठी जास्ती जागा लढवता याव्यात यासाठी उबाठाने दिल्लीवारी केली, मात्र त्याही बाबतीत निराशाच पदरी पडणार आहे. ज्या अमित शाह यांची तुलना ठाकरे यांनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असताना मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते. २०१९ मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत तुम्हाला १२५ जागा दिल्या होत्या. आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागते आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत, मग तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमके पदरी तरी काय पाडून घेतले?" असा खोचक भाजपाने केला.

"महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. ती देखील धुळीस मिळाली. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताशी काहीही देणे-घेणे नाही हे पुन्हा दिसून आले," असा घणाघातही उपाध्ये यांनी केला.

Web Title: BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over Delhi Visit to congress high command Maharashtra Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.