मुंबई - आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या. चला मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
"पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?" असं म्हणत निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका. मला अटक करा असे छातीठोक सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कृपया सांगा पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते? मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नबाबच समर्थन आपण करत आहात" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार, महापालिकेतील घोटाळे यांना उत्तर दिलेच; पण मंत्री नवाब मलिक यांची जोरदार पाठराखण केली. मुदस्सर लांबे यांना हार घालून सन्मान करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी कदाचित त्यांच्यावरील गुन्ह्याची आपल्याला माहिती नसेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला. लांबे यांच्या पत्रावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची स्वाक्षरी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मर्यादा ओलांडल्या
टीकेला, बदनामीला आपण जराही घाबरत नाही; परंतु कोणत्या थराला जाऊन बदनामी करायची, तथ्यहीन आरोप करायचे याच्या मर्यादा तुम्ही ओलांडल्या आहेत. एकच गोष्ट सतत सांगितली की, सत्य वाटायला लागते. केंद्रातील या तपास यंत्रणा हे तुमच्या हातातले बाण असून, ते लक्ष्यांच्या छातीत खुपसले जात आहेत. सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये संधी दिली पाहिजे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
‘यांचा जीव मुंबईत’
रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे. मुंबईसारखे शहर जगात नाही. मी मुंबईकर असल्याचा मला अभिमान आहे, असे ठाकरे म्हणाले.