उद्धव ठाकरे यांनी "माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वैगेर विषयच नाही. येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे" अशा शब्दांत शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटल्यानंतरही शरद पवारांच्या भेटीला गेले. तसे शिंदेंकडे गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर या संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. या मुलाखतीवरून भाजपाने आता खिल्ली उडवली आहे.
"सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी, सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी, घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय 'राजा' शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा!" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी हल्लाबोल केला आहे.
"‘विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव!इथे सरळ चालतो उंट अन् हत्ती तिरका,आता, फक्त राजाच शिल्लक आहे बरं का !
सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती !प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफातीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा !
‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी,सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी,घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय 'राजा'शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा!" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी "माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे, तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असं जर चालू राहिलं तर कठीण आहे. उद्या खोके येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल" असंही म्हटलं आहे.