Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. "राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता राज्याला गृहमंत्री आहे का? असेल तर एवढा दुबळा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही," असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. या टीकेला भाजपाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
"काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखादं-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या. लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की अशक्त, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय?, याचं आत्मपरिक्षण करा," अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
"माफी मागून असा विषय मिटतो का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे. मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का? सरकारच्या गळ्याशी आल्याने, तोंड दाखवायला जागा नसल्याने असे बोलतायत की मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. नुसत्या माफीला काही अर्थ नाही. या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहीर करा. नंतर माफी मागा," असा खोचक सल्ला राऊतांनी मुख्यमंत्र्याना दिला होता.
"तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात. तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही कसे गृहमंत्री? सरकारची लाज गेली आहे. ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही. प्रधानमंत्री कायम मौनात असतात. जिथे चमकायला मिळते, तिथे बरोबर येतात. ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधली जातात. एरवी शिवजयंतीला ते ट्विट करतात. पण पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी लगेच एकही ट्विट केले नाही," याकडे राऊतांनी लक्ष वेधले.