Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती, प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश होणार का, तसेच आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास कौल कोणाच्या बाजूने लागणार याबाबत घेतलेली जनमत चाचणी यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असून, कोणाची बाजू घेणार अशी विचारणा केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर मोदी सरकार करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परस्परविरोधी विधाने केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली असून, ठाकरे गट महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. पवार आणि आंबेडकर यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ घेत भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शरद पवार की प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार?
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केले आहे. शरद पवार म्हणातायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय. प्रकाश आंबेडकर म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही. या विरोधाभासी वक्तव्यांमध्ये उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार? न घरका ना घाटका अशी परिस्थिती होणार, अशी खोचक टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंमलबजावणी संचनालय (ED), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग यांचा गैरवापर करत आहेत, असे वाटत नाही. त्यांच्या जागी मी असतो, तरी तेच केले असते. कोणाही सत्ता राखण्यासाठी जे करतो, तेच नरेंद्र मोदी करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल केलेल्या विधानाबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले होते. तेव्हा शरद पवार म्हणाले की, अलीकडे आम्ही पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय. यावरून केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"