ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना, भाजपा आणि शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सत्तांतर झाल्यानंतरची ही स्थानिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळे कोणाचा वरचष्मा असणार यावरून त्या पक्षाची ताकद समजणार आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडीत गाठले असून ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपा 1214, शिंदे गट 546, ठाकरे गट 412, राष्ट्रवादी 786, काँग्रेस 514 एवढ्या ग्राम पंचायतींवर विजय मिळवला आहे.
भाजपाने मोठी झेप घेतली आहे. याच दरम्यान आता भाजपाने नंबर वन आम्हीच असल्याचा दावा केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी "तिन्ही पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपाचे प्रचंड यश. आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाची जोरदार मुसंडी इतर तीन पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही. निकाल अजून येत आहेत तरी #भाजपा_नंबर_1 #भाजपा 1204 #उध्दव ठाकरे गट 124 #काँग्रेस 95 #राष्ट्रवादी 161" असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्येही सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती. यात हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"