Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील निवासस्थांसह त्यांच्या मुलांच्या आणि मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहे. रोखायचे असेल, तर रोखून दाखवा, असे आव्हान दिले आहे.
कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होते. त्यामुळे मला रोखले गेले होते. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही मांडावे
छोट्या कंपनीला १५०० कोटींचे टेंडर दिले आहे. ते कसे दिले? आता कारवाई सुरू आहे. सगळे पेपर, डॉक्युमेंट समोर आहेत. या संबंधित आता कारवाई होणार आहे. मी मुस्लिम आहे म्हणून माझ्यावर कारवाई होत असल्याचे ते सांगतात. गोरगरीबांना लुटताना त्यांना धर्म आठवला नव्हता का? हसन मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही मांडावे, असे किरीट सोमय्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ यांच्या जावयाची कंपनी कधी जन्माला आली? १५०० कोटींच्या कामाचे वर्क ऑर्डर आपण दिले होते. जावयाला पैसे द्यावे लागणार असे आदेश हसन मुश्रीफ यांनी काढले होते. मुश्रीफ यांचे सेक्रेटरी या घोटाळ्यात सामील आहेत. त्यांची चौकशी होणार आहे, असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी १२ तासांहून अधिक काळ ईडीकडून कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ही कारवाई सुरू असताना मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते. मुश्रीफ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"